MTEचा कि वालचंदचा?
दीक्षांत सोहळा कार्यक्रमासंदर्भात वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ .
पार्श्वभूमी
-काही दिवसापूर्वी ,२०१६ साली पदवीप्राप्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांच्या दीक्षांत सोहळ्यास ४ वर्षे पूर्ण झाली . याचं औचित्य साधून , ४ वर्षांपूर्वी दीक्षांत सोहळ्याच्या पूर्वसंध्येला लिहिलेला हा वृत्तांत तुम्हा सर्वांच्या भेटीस आणत आहे.
टीप :वृत्तांतात वापरलेल्या बहुतांश संकल्पना ,घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही , असल्यास तो केवळ योगायोग समजावा.
सांगली ( दि. २७/०५/२०१६) - येथील एक प्रतिभावंत महाविद्यालय म्हणून सन्मानास आलेल्या "वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात उलट सुलट मुद्द्यावरून आग धुमसण्याची एक विलक्षण परंपरा आहे . अशा या परंपरेचा एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी MTE विरुद्ध वालचंद नियामक मंडळ या दोन संस्थांमधील परंपरागत वाद पुन्हा उफाळून आला . सूत्रांच्या माहितीनुसार अनेक वर्षांपासून खंडित असलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यासंदर्भाच्या खटल्यावर उच्च न्यायालयाकडून योग्य ती सुनावणी होऊन सदरच्या खटल्याचा
निकाल MTE सोसायटी या संस्थेच्या बाजूने लागला . सदरच्या निकालाच्या परिणामातून वालचंद महाविद्यालयाचे
सर्वेसर्वा व सध्याचे डायरेक्टर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली . प्रस्तुत
घटनेचे तीव्र पडसाद महाविद्यालयात होणाऱ्या "दीक्षांत सोहळा २०१६" या पदवीप्रदान
कार्यक्रमावर होण्याची दाट शक्यता महाविद्यालयाच्या प्रत्येक स्तरातून व्यक्त केली
जात आहे . या घटनेमुळे दीक्षांत सोहळा नेमका MTE सोसायटीचा कि वालचंदचा अशी संभ्रमावस्था
सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये जाणवत आहे.
या संभ्रमावस्थेमुळेच महाविद्यालयातील प्रत्येक विभागाचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्याकडून नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत . प्रस्तुत अवस्थेचे परिणाम मुख्यत्वेकरून "आंतरराष्ट्रीय कुरघोडी स्पर्धेचा विजेता " संघ "यांत्रिकी विभाग " यावर होताना आढळून आले. दरम्यान सांगली स्थित यांत्रिकी विभागाचे कार्यकर्ते श्री. केचन
यांनी वेळोवेळी Whatsappच्या माध्यमातून दीक्षांत सोहळ्यासंबंधित ताज्या घडामोडी
सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वपूर्ण काम केलं . महाविद्यालयात चालणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर आपली करडी नजर ठेवणारे यांत्रिकी विभागाचे श्री. पलाश बाहेती
यांनी घटनेची माहिती समजताच महाविद्यालयातील त्यांचे निकटवर्तीय श्री. परांजपे (सर) यांची भेट घेऊन सदरच्या गोंधळाची कारणमीमांसा जाणून घेतली . महाविद्यालयातील प्रत्येक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पाडण्यासाठी सिंहाचा वाट उचलणारे , रोजगार हमी संघटनेचे प्रवक्ते व नेते श्री. संजय धायगुडे (सर ) यांनी कार्यक्रमाचे आयोजक कुणीही असो , आपण आपल्या जबाबदारीस तत्पर राहून समारोह शांततेत पार पाडण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना केले .हाती आलेल्या वृत्तानुसार "Best Student " या पारितोषिकासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार असलेले साहिल मुजावर सदरच्या गदारोळाबद्दल भलतेच नाराज असून त्याच्या निषेधार्थ त्यांनी समारोहादिवशी प्रवेशद्वारासमोर उभे राहून ठिय्या आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.
दैनिक वालचंद ने यांत्रिकी विभागातील अनेक पुढाऱ्यांशी संपर्क साधला . अशाच काही संवादा अंती असे निष्पन्न झाले कि , ' धुंदीत राहू ' या संघटनेचे कार्यकर्ते शुभम पाटील , आशिष ताकपेरे आदी मंडळींनी घडल्या प्रकाराबद्दल उदासीनता आणि निष्काळजीपणा दाखवत संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना दीक्षांत सोहळ्याच्या अंतापर्यंत धुंदीत राहून सहकार्य करण्याची जबरदस्ती केली आहे . Stability या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे जनक श्री. शंतनू गावडे हे दैनिक वालचंद शी बोलताना म्हणाले " सदरच्या गोंधळाच्या स्थितीतून सन २०१२-२०१६ या कालखंडात शिकलेल्या विद्यार्थ्यांना २ पदव्या मिळणार आहेत ( अनुक्रमे MTE सोसायटी कडून आणि वालचंद नियामक मंडळाकडून ) . अन माझ्या संकल्पनेनुसार या दोन पदव्या विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात stable करण्याचं काम या संस्थांनी केलं असं मला वाटतं . त्याबद्दल मी दोन्ही संस्थांचे सादर आभार मानतो. " विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल विचारपूस केली असता ते म्हणाले " २०१२-२०१६ या कालखंडात शिकणारे सर्व विद्यार्थी भाग्यवान आहेत कारण या सर्व विद्यार्थ्यांना २०१६ साली पदवी मिळणार असून माझ्या माहितीनुसार १६ हा आकडा अत्युच्च stability चा आहे . दैनिक वालचंद ने साधलेल्या असंख्य मुलाखतीत श्री.शंतनू गावडे यांच्या मुलाखततीतच समाधानाचे सूर दिसून आले.
कमकुवत हृदय संघटना आणि आत्मदहन ?
काही दिवसाच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे कि कमकुवत हृदय संघटनेचे प्रमुख आणि अल्पावधीतच "यांत्रिकीचा भटका आशिक" या नावाने प्रसिद्ध रोहित पंदारे यांनी गोंधळाच्या स्तिथीला कंटाळून काही सहृदयी कार्यकर्त्यांसोबत महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्राध्यापक श्री.बी.एस.गवळी (सर) यांच्या मध्यस्ती नंतर कार्यकर्त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे समजते.
सर्व घटनाक्रमादरम्यान गतवर्षीपासून 'कुणी पदवीचा कागद देता का रे कागद?' अशी आर्त हाक मारून समाजासमोर टाहो फोडणारे हरीपूरचे श्री.ओंकार मालवणकर यांनी प्रकल्पासाठी नियोजित खर्चाचा मोबदला योग्य नीतीने न मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या कॅशियर ची गळफट पकडून हुल्लडबाजी केल्याचे सूत्रांकडून समजले . याउलट ओंकार मालवणकर यांच्या प्रकल्पातीलच एक सदस्य , "नक्षलवादी ते थेट अभियंता" या गाजलेल्या कादंबरीचे लेखक व गेल्या ३-४ वर्षांपासून " धत 'तेरी कि मै, धत 'तेरी कि मै घर नई जाना " या हिंदी गीताला साजेशी कामगिरी बजावत कमीत कमी वेळात स्वगृही जाण्याचा विलक्षण विक्रम स्वतःच्या नावावर असणारे
श्री. पंडाल
यांनी महाविद्यालयातील परिस्थिती बद्दल बोलणे टाळले. पण समारंभदिवशीही वसतिगृहात राहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना "चिपको हॉस्टेल से" या आगळ्या वेगळ्या प्रकल्पात एकमुखाने सहभागी होण्याचे आवाहन केले. यांत्रिकी विभागाचे आइनस्टाइन म्हणून प्रसिद्ध श्री.सौरभ पाटील यांनी ISRO ने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या satelite मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्याने दीक्षांत सोहळ्याशी संलग्न एखादा कार्यक्रम घेऊन त्यांचा सत्कार करण्याची मागणी स्वतःच केली. तसेच दीक्षांत सोहळ्याची वेळ नियोजित करण्यासाठी सोलर ट्रॅकिंग सिस्टिम चा उपयोग न करताच कार्यक्रमाची वेळ निश्चित केल्याबद्दल खेद व्यक्त केला. अलीकडच्या काळात विजय मल्ल्या यांच्या सर्व उद्योग धंद्यावर जातीनं लक्ष देणारे व यांत्रिकी विभागाचे रावण अशी ओळख असणाऱ्या आशिष ताकपेरे यांनी कामाच्या अतिभारामुळे कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. फुटबॉलचे चाहते श्री. मुरली यांनी रात्री २ वाजता असणाऱ्या एका रोमांचक सामन्याला मुकावं लागल्याने त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ करून पत्रकार परिषदच बरखास्त केली .
'झिंगाट प्रेमी ' तसेच यांत्रिकी विभागाचा 'गोविंदा' अशी ओळख असणारे व UPSC च्या स्वप्नाने झपाटलेले श्री. अभिनव बालुरे दैनिक वालचंदशी बोलताना म्हणाले , "दीक्षांत सोहळ्यासारख्या पवित्र कार्यक्रमाला डॉल्बीची व्यवस्था केली नसल्याने मी अत्यंत नाराज होतो. पण नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार प्रमुख पाहुणे म्हणून एका IAS अधिकाऱ्याला महाविद्यालयानं बोलावणं धाडल्यानं मी समाधानी आहे.
दैनिक वालचंद ला मिळालेल्या काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया -
"दीक्षांत समारोपाला उपस्थित राहणाऱ्या पालकांच्या प्रवासाची तसेच कार्यक्रमस्थळी त्यांना सुखरूपपने पोहोचवण्याची व्यवस्था म.रा.प,म.(महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) च्या बसेसकडे सुपूर्द करावी अशा मागणीचा करार मी व्यवस्थापन समितीकडे दिलेला असतानाही समितीने या गोष्टीकडे केलेला कानाडोळा अतिशय खेदजनक आहे . यावरून समितीचा म.रा.प,म. वरचा अविश्वास दिसून येतो. पण दैनिक वालचंद च्या माध्यमातून मी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो कि परतीचा प्रवास हा कृपा करून महामंडळाच्या बसेसनीच करावा. कारण महामंडळाच्या बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास !"
- पाटील , अध्यक्ष -म.रा.प,म
" नियोजन समितीच्या वेळापत्रकावरून मुख्यत्वे समितीचं चित्रपटसृष्टीबद्दल असलेल अज्ञान दिसून येतं . दीक्षांत सोहळ्याची वेळ आणि दिनांक ठरवताना त्या काळात एखादा चित्रपट प्रदर्शित होतोय का ?याची जराशीही दखल घेतली नाही. सततच्या वेळापत्रक बदलामुळे आणि गोंधळामुळे या आठवड्यातील प्रदर्शित चित्रपटांचं इत्यंभूत समीक्षण राहून गेलं . त्याबद्दल माझ्या प्रेक्षकवर्गाला मी दिलगिरी व्यक्त करतो . "
- शेखर कुलकर्णी , ज्येष्ठ चित्रपट समीक्षक .
यांत्रिकी विभागाचे माजी वर्गप्रमुख श्री. विपुल शिराळकर यांनी whatsapp च्या माध्यमातून दिलेल्या संदेशातून दीक्षांत समारोह दिनांक २८ मे २०१६ रोजीच होण्याचे संकेत दिसत आहेत. सदरच्या वृत्ताची निश्चिती यांत्रिकी विभागाचे सर्वेसर्वा श्री. अभिजित बागल यांनी रात्री उशिरा केल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतलाआहे.
सदरच्या लेखात उल्लेख केलेले अनेक पात्र आज देश -विदेशात , सरकारी /खाजगी संस्थांमध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर तैनात आहेत. त्या सर्वानी या लेखावर योग्य ती प्रतिक्रिया comments च्या माध्यमातून लिहिणं मी अनिवार्य मानतो .
प्रतिक्रियांच्या अपेक्षेत ,
क्ष .
