वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी विभागात शिकत असताना 2012 ते 2016 या कालावधीत नानाविध प्रसंगांना अथवा घटनांना सामोरं जावं लागलं. कॉलेज काळात कधी lectures च्या दरम्यान तर कधी फावल्या वेळेत या घटनांना वृत्तपत्रांच्या बातम्यांचे स्वरूप देऊन त्या रंजकपणे मी लिहीत असे . या बातम्या सुवर्ण आठवणी म्हणून सर्वांच्या हृदयात आजही जिवंत आहेत . त्यांना ब्लॉग्स च्या माध्यमातून डिजिटल रूप देऊन अधिक ज्वलंत करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी लेखक क्ष करत आहे . अपेक्षा आहे तुम्हा सर्वाना हे डिजिटल रूपही तितकच आवडेल .
(टीप - काही कारणास्तव काही पात्रांची खरी नावे वगळून त्यांना इतर नावे देण्यात आली आहेत . सदरच्या घटना वास्तवदर्शी असल्याने काहींच्या भावना प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे दुखावल्या जाण्याची शक्यता आहे . त्यामुळे अगदी सुरुवातीलाच precautionary step म्हणून दिलगिरी व्यक्त करतो . )
वालचंद च्या राजकारणात दादांची मुसंडी ?
सांगली (दि. ०७ ऑगस्ट २०१४)- येथील वालचंद महाविद्यालयातील कुरघोडी सम्राट म्हणून उदयाला आलेला तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा वर्ग बऱ्याच कालावधीपासून घडामोडींपासून अलिप्त होता. मध्यंतरी हाती आलेल्या काही वृत्तांच्या माध्यमातून असे निदर्शनास आले आहे की प्रस्तुत वर्ग पुनःश्च सर्वसामान्य विद्यार्थी व शिक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे . प्रस्तुत वर्ग पुन्हा एकदा कुरघोडीच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी काही पूर्वग्रहदूषित कारणे जबाबदार आहेत. त्या कारणांपैकी एक कारण म्हणजे माणुसकीच्या शत्रू म्हणून उदयाला आलेले शिक्षक श्री गोगो व वर्गाचे माझी वर्गप्रमुख माननीय वासरू दादा शिराळकर यांच्यातील धुमश्चक्री हेच होते.
सूत्रांच्या माहितीनुसार सप्ताहाच्या सुरुवातीला म्हणजे सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 10.15 च्या सुमारास श्री गोगो तृतीय वर्ष यांत्रिकी च्या वर्गात व्याख्यानाकरिता रुजू झाले . वर्गातील बहुतांश विद्यार्थी चहापानासाठी असलेल्या १०.०० ते १०.१५ च्या सुट्टीत चहापानासाठी वर्गाबाहेर गेले होते. तिसऱ्या व्याख्यानाच्या वेळेपूर्वी पाच मिनिटे श्री गोगो व्याख्यान घेण्यासाठी आले . पाच मिनिटांच्या आत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली तर बहुतांश विद्यार्थी, जे विहित वेळेनंतर वर्गात येण्यास इच्छुक होते अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत शिक्षकाने वर्गा बाहेरचा रस्ता दर्शवला. या सर्वातूनही बंडखोर गटाचे प्रमुख श्री गावडे यांनी वर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला पण सदरचा प्रयत्न पूर्णतः अयशस्वी ठरला. याप्रसंगी विद्यार्थी तसेच व्याख्यानदाते यांच्या मनात घालमेल चालू झाली. याच वेळी माजी वर्गप्रमुख वासरू दादा स्वतःचे कामकाज साहित्य उचलून घेण्यासाठी धडपड करत होते . संधीचा फायदा व वासरू दादांची असलेले पुर्व वैमनस्य याचा सुवर्णमध्य साधून श्री गोगो यांनी मनातच कट रचला या कटाचाच एक भाग म्हणून
वासरू दादा यांना वर्गातील अग्र बाकांवर बसण्यास आमंत्रण दिले. वासरू दादा
समर्थक असलेले वर्गातील विद्यार्थी या कृतीमुळे भांबावून गेले. त्याच क्षणी
श्री गोगो यांनी आपल्या विचित्र असा कटाक्ष सर्व
कार्यकर्त्यांवर टाकला व कार्यकर्त्यांमधील आग धुमसवण्याचा प्रयत्न केला
. दादांना समोरच्या बाकावर बोलावून त्यांच्या अब्रूची लख्तरे मांडण्यात आली
. श्री गोगो यांनी माणुसकीला काळिमा फासणारे भाष्य करीत
स्वतःची "माणुसकीचा शत्रू " हि ओळख सिद्ध केली . तसेच साहेबाना (दादांचे
पालक /जेष्ठ बंधू) समोरासमोर आणून स्वतःची कर्तव्यनिष्ठा सिद्ध करण्याची एकमेव
संधी दिली .
प्रस्तुत घटनेनंतर दैनिक वालचंद ने तृतीय वर्ष अभियांत्रिकी
(यांत्रिकी विभाग ) च्या विविध गटनेत्यांशी संपर्क साधला . त्याप्रसंगी दादा
समर्थक श्री शेखर भाऊ कुलकर्णी म्हणाले " सदरचे कृत्य खरोखरच निंदाजनक असून
एखाद्या शिक्षकाने स्वतःची मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांच्या नैतिकतेवर घाव घालणे
हे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेस हानिकारक आहे . "
या प्रसंगी मिळालेल्या काही इतर प्रतिक्रिया
:
"बदलत्या परीक्षा पद्धतीचे वारे
महाविद्यालयात वाहत असताना शिक्षकांशी असे वैर धरणे हे दादांच्या शैक्षणिक
आणि समाजीक कारकीर्दीस हानिकारक ठरेल. अशा शिक्षकांचे समर्थन हि काळाची गरज
आहे . " - पार्ले (G)(चिंटू) ,गटनेते -थेट द्वितीय वर्ष प्रविष्ठ
संघटना.
"दादांच्या ऐवजी सदरचा प्रकार जर माझ्या
बाबतीत घडला असता तर संबंधित शिक्षक व अनुयायी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असता
. पण दादांनी या प्रसंगी साधलेले मौन कौतुकास्पद आहे . " - यासीन भटकळ
, अध्यक्ष-MESA MESC.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (म.रा. प. म )
अध्यक्ष व दादांचे सहकारी , तसेच तंत्रज्ञानाचा उगवता सूर्य हि ख्याती मिळवलेले
सौरभ सावंत (पाटील ) म्हणाले ," सदरची घटना खेदजनक आहे . त्याबद्दल प्रथमतः
मी दिलगिरी व्यक्त करतो .पण अशा आणीबाणीच्या काळातही माझी महामंडळाची गाडी शर्थीचे
प्रयत्न करून पकडण्यात मला यश आले यातच मी समाधान मानतो . "
महाविद्यालयातील काही
कर्तव्यनिष्ठ व कार्यक्षम गुप्तहेरांनी 'दनाने ' वसतिगृहाचे अधिपती श्री
मुरली त्यांच्यावर करडी नजर ठेवली . त्यातून असे आढळले की मुरली हे
गेल्या काही दिवसांपासून सहा ते सात या वेळेत नेहमीप्रमाणे आपल्या
खोलीत न थांबता महाविद्यालयाच्या भयावह ग्रंथालयात
जाताना आढळले . सखोल माहितीनंतर लक्षात आले कि मुरली .श्री गोगो यांच्या भूलथापांना बळी पडले असून ते श्री गोगो यांनी राबवलेल्या एका योजनेत फसले आहेत .
प्रस्तुत योजना म्हणजे अनधिकृतपणे चालवली जाणारी १०,००० रुपयांची जर्मन भाषेची
शिकवणी आहे . या शिकवणी विषयी अधिक माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी मुरली यांच्याशी
साधलेला संपर्क अयशस्वी ठरला . घटनेची व्याप्ती लक्षात आल्यानंतर स्वतःची व्याखाने
इतर शिक्षकांना वाटून श्री गोगो बेपत्ता झाल्याचे आढळले . जर्मन शिकवणी घेणाऱ्या
विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकावर फिर्याद दाखल करण्याची मागणी करत शिक्षक
कक्षेसमोर धरणे आंदोलन केले .
घटनेचे केंद्रस्थान असलेल्या व
चुकीव्यतिरिक्त गुन्ह्यात अडकलेले दादा आपल्या समर्थकांसह महाविद्यालय परिसरात
फिरताना आढळले. संबंधित घटनेची प्रतिक्रिया विचारली असता दादा डाफरले "
माणुसकीला काळिमा असणाऱ्या श्री गोगो याना त्यांची लायकी दाखवून देईन तसेच शैक्षणिक
आणि सामाजिक कार्याचा दबदबा दाखवत महाविद्यालयाच्या राजकारणात मुसंडी
मारेन."
घटनास्थळावरून आलेल्या माहितीनुसार
महाविद्यालयातील सर्व कारभार शांततेत चालू आहे पण दादांच्या कार्यकर्त्यांमध्ये
धुमसणारी अपमानाची आग शिगेला पोहोचली आहे . तसेच वर्गाची नवी पहाट अर्थात मा. भूषण
पाटील यांनी सर्वाना शांततेचे आवाहन करत दादांना तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना
राजकारणातून निवृत्त्ती घेऊन फक्त शैक्षणिक क्षेत्रात लक्ष्य देण्याचा
उपयुक्त सल्ला दिला .
- तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांच्या
अपेक्षेत ,
क्ष

“There is no greater agony than bearing an untold story inside you.”
ReplyDeleteBest of luck and keep it up👍👍👍
Thanks Akshay and let me know for suggestions if you have any.
Deleteह्या लेखांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी भावना निर्माण करणे हा मार्मिक हेतू आहे . हा हेतू सफल होताना पाहून आनंद होतोय .
ReplyDelete